जळगावसामाजिक

नाविन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा आणखी एक प्रयोग; इको क्लबतर्फे ‘सीड मोदक हॅकाथॉन’

मेहरूण : नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबतर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘सीड मोदक हॅकाथॉन’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

‘बाप्पाच्या नैवेद्यातून वृक्षनिर्मितीकडे’ ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी गटांमध्ये काम करत सीड मोदकाचे विविध नमुने तयार केले. विविध प्रकारच्या बिया, कडधान्ये आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक मोदक तयार करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारली.

या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम पर्यावरणाशी संबंधित समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय सुचविले. त्यानंतर योग्य बियांची निवड, नैसर्गिक साहित्याचा वापर, मोदकाची रचना, टिकाऊपणा तसेच भविष्यात या बियांचे रोपण कसे करता येईल, यावर विद्यार्थ्यांनी प्रयोग केले. प्रत्येक गटाने तयार केलेला सीड मोदक प्रोटोटाइप सादर करून त्यामागील संकल्पना स्पष्ट केली.

‘मोदक खाण्यासाठीच नव्हे, तर पेरण्यासाठीही!’ असा पर्यावरणपूरक संदेश देत विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड दिली. तयार केलेल्या सीड मोदकातील बिया योग्य वेळी मातीमध्ये पेरून त्यातून रोपे तयार करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

इको क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार, समस्या निराकरण, प्रयोगशीलता, टीमवर्क आणि पर्यावरणीय जबाबदारी विकसित करण्यास मदत झाली. उत्सव, नवोपक्रम आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे पालक व शिक्षकांनी कौतुक केले.

मुख्याध्यापक इको क्लबचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक, पर्यावरण समितीच्या प्रमुख रुपाली आव्हाड तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button