
मेहरूण : वाढती उष्णता व बदलते हवामान लक्षात घेता श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेत “Seed Bank” संकल्पना सुरू करण्यात आली आहे.
सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही आंब्याच्या तसेच विविध फळांच्या बिया फेकून न देता त्या शाळेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या बियांपासून भविष्यात वृक्षारोपण व संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होऊन निसर्गप्रेमाची भावना वाढीस लागणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. तसेच पालक व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी केले आहे.






