
जळगाव, दि. २५ : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शनिवारी आकाशवाणी चौक येथील पक्ष कार्यालयासमोर पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाकडून आंदोलन, निवेदने व विविध माध्यमांतून सातत्याने करण्यात येत होती. आज देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा पक्षाने केला असून, त्याचे स्वागत म्हणून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी पक्षाच्या वतीने नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय मलिक, प्रदेश युवक सरचिटणीस रमेश पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मजर भाई पठाण, सरचिटणीस वायरस महाजन, विनायक पाटील, सुनील माळी, राजू मोरे, रिकू चौधरी, मोहसीन खान, नईम खाटीक, नामदेव वाघ, जुवेद शेख, अकबर पैलवान, नितीन सकट, गुलाब शेख, सोनू माळी, गौरव गाढवे, कुणाल कोळी, कुणाल पाटील, गौरव विसपुते, अमर पाटील, निलेश वानखेडे, प्रतीक पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






