
जळगाव – प्रजाशक्ती क्रांती दलाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गहिनीनाथ वाघ यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आजपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) जळगाव येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. विभागातील भ्रष्टाचार, प्रशासकीय निष्क्रियता आणि नैतिक जबाबदारीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नैतिक राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच तत्कालीन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
गहिनीनाथ वाघ यांनी आरोप केला की, परिवहन विभागातील काही अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर वसुलीमध्ये सहभागी असून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असूनही प्रभावी कारवाई होत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी व विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उपोषणकर्त्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. तसेच परिवहन विभागातील कार्यपद्धती पारदर्शक करण्यासाठी चाचणी मैदान, इन्स्पेक्टर रूम, कार्यालयीन कामकाज तसेच वायुवेग पथकांच्या (फ्लाईंग स्कॉड) कार्यवाहीचे चित्रीकरण करून ते शासकीय नोंदी स्वरूपात जतन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय मुक्ताईनगर तालुक्यातील करकी येथील सीमा तपासणी नाका कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली असून त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
गहिनीनाथ वाघ म्हणाले की, श्रमिक आणि सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी ही लढाई सुरू करण्यात आली असून प्रशासनाने आंदोलनासाठी मंडप व स्टेजची व्यवस्था नाकारली तरीही आंदोलन मागे घेतले जाणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या :
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा नैतिक राजीनामा घेणे.
तत्कालीन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करणे.
प्रादेशिक परिवहन विभाग जळगावमधील संबंधित भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी व विभागीय कारवाई.
संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी.
बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबविणे.
करकी (ता. मुक्ताईनगर) चेकपोस्टवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व दोषींवर कारवाई.
करकी सीमा तपासणी नाका कायमस्वरूपी बंद करणे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांच्याविरुद्ध विशेष चौकशी.
मोटार वाहन निरीक्षक नितीन सांवत व सुरेंद्र चौरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई.
चाचणी मैदान, इन्स्पेक्टर रूम, फ्लाईंग स्कॉड तसेच सीमा तपासणी नाक्यांवरील कार्यवाहीचे संपूर्ण चित्रीकरण करून पारदर्शकता सुनिश्चित करणे.
आंदोलनामुळे परिवहन विभागातील कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






