जळगावसामाजिक

शहीद हेमु कलानी उद्यानाच्या सुशोभीकरणासह विविध सुविधांसाठी आयुक्तांना निवेदन

जळगाव : शहरातील शहीद हेमु कलानी उद्यानाची दुरवस्था दूर करून त्याचे सुशोभीकरण करावे, तसेच परिसरातील नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्यांचे निवेदन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहर महानगरपालिचे आयुक्त आदित्य जीवने यांना निवेदन दिले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहीद हेमु कलानी उद्यानाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून उद्यानाची सुरक्षा भिंत जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उद्यानाची उभारणी बहिणाबाई उद्यान व रामदास पार्क, एम.जे. कॉलेज परिसरातील उद्यानांच्या धर्तीवर शासकीय निधीतून करून नागरिकांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी उद्यानात बंदिस्त व्यायामशाळा (जीम), वाचनालय तसेच आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या आर.सी.सी. रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तातडीने गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

परिसरात भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

नवीन काँक्रीट रस्त्यांवर काही दुचाकीस्वार सुसाट वेगाने वाहन चालवत असून स्टंटही करत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी, सहसचिव रवींद्र जोशी तसेच गजानन ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button