
जळगाव – विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण व्हावे, विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले मत मांडता यावे तसेच पालकांनाही शाळेच्या गुणवत्ता विकासात सक्रिय सहभाग घेता यावा, या उद्देशाने संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे “विद्यार्थी समस्या निवारण प्रणाली” आणि “पालक तक्रार व सूचना पेटी” या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शाळेत “माझी समस्या – माझे समाधान” ही विद्यार्थी समस्या पेटी तसेच “पालक तक्रार व सूचना पेटी” उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी शैक्षणिक, शिस्त, स्वच्छता, पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य, ग्रंथालय आदी विषयांवरील समस्या व सूचना नोंदवू शकतील. त्याचप्रमाणे पालकही आपल्या पाल्याच्या शिक्षणासंदर्भातील अडचणी, शाळेच्या सुविधा किंवा विधायक सूचना लेखी स्वरूपात पेटीत टाकू शकतील.
प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींवर विद्यार्थी संसद, शिक्षक, मुख्याध्यापक आणि आवश्यकतेनुसार पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थी व पालकांना कोणतीही समस्या किंवा विधायक सूचना निःसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणि SQAAF च्या गुणवत्ता निकषांनुसार लोकसहभाग, पारदर्शकता आणि विद्यार्थी-केंद्रित व्यवस्थापनाला चालना देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.






