
जळगाव (दि. ११ एप्रिल २०२६) – महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर येथील रोहिदास मंगल कार्यालयात मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. ‘सारा फाउंडेशन’ व ‘भीमकन्या ग्रुप’, जिजाऊ नगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला वाघ नगर, जिजाऊ नगर, कोल्हे हिल्स परिसर व हरिविठ्ठल नगर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र व आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला आमदार राजुमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक अनिलभाऊ अडकमोल, भूषण लाडवंजारी, सारा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भालेराव, उपाध्यक्षा सुरेखा भालेराव, डॉ. सागर भालेराव तसेच जयसिंगजी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार राजुमामा भोळे यांनी महापुरुषांची जयंती आरोग्य शिबिराच्या माध्यमातून साजरी केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच डॉक्टरांच्या टीमचा सत्कार करून त्यांना महापुरुषांवरील पुस्तके भेट देण्यात आली.
शिबिरात नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे तसेच होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधेही वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाला विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वांद्रे सर यांनी केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.






