जळगावप्रशासकीय

भागपूर येथे ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार शोध अभियान’ राबविण्यास सुरुवात

जळगाव – तालुक्यातील भागपूर, उमाळा व देव्हारी गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार शोध अभियान’ अंतर्गत विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. १५ मे ते १५ जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान सुरू असून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य पथके घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. तसेच जळगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे आणि तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ अनिल नन्नवरे यांच्या सूचनेनुसार भागपूर परिसरात मोहीम राबविण्यात येत आहे.

आरोग्य उपकेंद्र कंडारी अंतर्गत आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, आरोग्य सेविका योगिता कोकाटे तसेच सीएचओ शिरीन पाटील यांच्या पथकाने भागपूर गावात घरभेटी देत नागरिकांची तपासणी केली. यावेळी कुष्ठरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचाराबाबत जनजागृती करण्यात आली.

मागील पाच वर्षांपासून एकही कुष्ठरुग्ण न आढळलेल्या गावांमध्ये विशेष सर्वेक्षण करून संभाव्य रुग्णांचा शोध घेतला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यास योग्य औषधोपचाराने आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो व त्याचा प्रसार रोखता येतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button