

चाळीसगाव – भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीदरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या धाडसाने आत अडकलेल्या सहा ते सात नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
या मदतकार्यादरम्यान पीएसआय गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय, सुरेश पोपट महाजन (वय ४६) यांना पाठीला व पायाला भाजल्यामुळे तर मयूर लक्ष्मण कुमावत (वय ३२) यांना उजव्या हाताला व पायाला भाजल्यामुळे देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
फायर ब्रिगेडच्या मदतीने आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असून, अधिकृत तपास सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
या घटनेत पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान व धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव तत्पर असल्याचे यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
धाडसी पोलिस कर्मचारी:
पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोलीस हवालदार अजय पाटील, नितीन वाल्हे, संदीप पाटील, पोलीस शिपाई दीपक चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, विलास पवार, प्रवीण पवार आणि राहुल नारेकर यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.




