राज्यप्रशासकीय

“नागरिकांना सेवा देऊन खरे लोकसेवक व्हा” – अब्राहम आढाव यांचे पोलीस कर्मचाऱ्यांना आवाहन

पुणे, १५ मे २०२५ –  बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत आज एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण सत्र पार पडले. या सत्रात सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन सुधारणा अभ्यासक अब्राहम आढाव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि लोकसेवकांची खरी ओळख म्हणजे नागरिकांना दिलेल्या वचनाप्रमाणे पारदर्शक, वेळेत आणि प्रामाणिक सेवा देणे, असे ठामपणे सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ३ प्रमाणे, प्रत्येक नागरिकाला ठराविक कालावधीत शासकीय सेवा मिळणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. परंतु, अनेकदा या सेवांचा विलंब किंवा टाळाटाळ होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे.

आढाव यांनी कलम ४ अंतर्गत, शासकीय सेवांची निश्चित मुदत, जबाबदार अधिकारी आणि अपील प्रक्रिया याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, कलम ८ अन्वये, नागरिकांना सेवा वेळेत न मिळाल्यास प्रथम व द्वितीय अपील अधिकारीकडे अपील करण्याचा अधिकार आहे.

“शासनाची प्रतिमा प्रामाणिक सेवेमुळेच उजळते. नागरिकांनी तुमच्याकडे येऊन पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पत्ता विचारू नये, इतकी पारदर्शक आणि तत्पर सेवा हीच खरी लोकसेवा आहे,” असे सांगत आढाव यांनी कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव करून दिली.

या कार्यक्रमास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  रवींद्र गायकवाड, उपनिरीक्षक कदम, आणि कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button