

जळगाव – आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता सामाजिक, आरोग्य क्षेत्रात निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे सेवारत असलेले आरोग्यदूत, रक्तमित्र मुकुंद गोसावी यांची
जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटिल यांनी रक्तदान जनजागृती या कार्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर ( स्टार प्रचारक ) म्हणून नुकतीच निवड केली.
तप्त उन्हाळा असल्याने सुरळीत रक्तपुरवठ्यासाठी अडचण येत असते. थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षय या गंभीर आजरासह प्रसुती साठी येणाऱ्या महिलांना नेहमी रक्ताची गरज भासते. तसेच सध्या सर्वत्र राष्ट्रासाठी मिशन सिंदुर या उपक्रमासाठी प्रशासनासह आरोग्य विभाग देखील रक्त संकलनासाठी कार्यरत आहे.
रक्तदाते मुकुंद गोसावी हे नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करून वेळोवेळी स्वतः सुद्धा रक्तदान करीत असतात त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळेस रक्तदान केलेले आहे. सुदृढ समाजाला त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, शहरांसह ग्रामीण भागातही रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी गोसावी यांची निवड करण्यात आलेली आहे. कोरोना काळातही गोसावी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिव्यांग मोटरसायकलवर फिरून मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा केली होती. ते कोरोना लसीकरण कार्याचेही स्टार प्रचारक होते.




