

जळगाव (दि. 27 मे 2025) :
जळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता मिळकत धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करता येण्यासाठी मनपाने अंतिम मुदत 31 मे 2025 पर्यंत वाढवली आहे. विशेष म्हणजे, अंतिम दिवशी म्हणजेच शनिवार, दिनांक 31 मे रोजी शासकीय सुट्टी असूनही प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 चे कार्यालये दिवसभर सुरू राहणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.
मालमत्ता कराच्या आगाऊ भरण्यावर 10% सवलतीची योजना दिनांक 21 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आजपर्यंत एकूण 26,510 मिळकतधारकांनी आगाऊ कर भरून या सवलतीचा लाभ घेतला आहे. यामुळे मनपाला एकूण 22.63 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये प्रभाग समिती क्रमांक 1 कडून 8.03 कोटी, क्रमांक 2 कडून 8.29 कोटी, क्रमांक 3 कडून 4.89 कोटी आणि क्रमांक 4 कडून 6.42 कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.
नागरिकांकडून योजनेला मिळालेला चांगला प्रतिसाद, तसेच मुदतवाढीची वाढती मागणी पाहता आयुक्त ढेरे यांनी 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेच्या अखेरच्या चार दिवसांत नागरिकांनी अधिक संख्येने सहभागी होण्यासाठी प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनपा उपायुक्त (महसूल) श्रीमती धनश्री शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिकाधिक नागरिकांनी या मुदतीत मालमत्ता कर भरून 10% सवलतीचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिकेच्या महसूल वाढीस सहकार्य करावे.




