

जळगाव– शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरासोबत विविध सांस्कृतिक झांजपथके, भव्य सजावट आणि मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले.
हिंदवी अकॅडमीचा युवा कलाकार हर्ष सचिन सोनवणे याने नेत्रदीपक मल्लखांब सादरीकरण करून मिरवणुकीला वेगळेच रूप दिले. ताकद, संतुलन आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम असलेल्या त्याच्या कसरतींना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
या सादरीकरणामागे गुरुवर्य धनराज भोई यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे हर्षने सांगितले. प्रथमच गणेश विसर्जन मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिक सादर झाल्याने उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शहरवासीयांनी या प्रयोगाचे मनापासून कौतुक केले असून पारंपरिक खेळ व सांस्कृतिक परंपरेला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांना पुढेही प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




