

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे आज दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी प्रथम वर्ष विद्यार्थी-शिक्षकांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेस पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, सौ. प्रा. सुवर्णा अहिरे आणि ग्रंथपाल पंकज वाघ उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वितीय वर्ष विद्यार्थी-शिक्षिका भावना पाटील यांनी केले. प्रथम वर्ष विद्यार्थी-शिक्षकांचे स्वागत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन केले. त्यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांचा परिचय करून घेण्यात आला.
कार्यक्रमात द्वितीय वर्ष विद्यार्थी-शिक्षिका मीनाक्षी पाटील, सुनिता पाटील, शिल्पा दुसाणे तसेच विद्यार्थी विवेक लहासे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रथम वर्ष विद्यार्थी-शिक्षकांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत खेळांचा आनंद लुटला. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यानंतर डॉ. जयश्री पाटील यांनी बी.एड. अभ्यासक्रमातील अभ्यासपूरक उपक्रम आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी बी.एड. अभ्यासक्रमा दरम्यान व्यक्तिमत्व विकास, संभाषणकौशल्य आणि वकृत्वकौशल्य यांची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माधुरी ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्वितीय वर्ष विद्यार्थी-शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले.




