जळगावक्राईम

अवैध प्रवासी वाहतूक व शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी जळगाव पोलिसांचा ॲक्शन मोड; ७० बसेस तपासल्या

“(प्रतिकात्मक छायाचित्र)”

जळगाव : कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थ तसेच अवैध शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या धडक कारवाईत ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २० हजार रुपयांचा थकीत दंड वसूल करण्यात आला.

ही मोहीम रात्री ८ ते १२ आणि पहाटे ४ ते ७ अशा दोन टप्प्यांत पार पडली. शहरातील आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, भुसावळ नाका, अमळनेर स्टॉप (पारोळा) आदी ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ४ आरसीपी प्लाटून्स, गुन्हे शोध पथकाचे ४ प्लाटून्स तसेच शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

तपासणीदरम्यान सर्व बसेसची झडती घेऊन चालक व वाहकांना अंमली पदार्थ, विनापरवाना शस्त्रास्त्रे किंवा प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमधील अग्निशामक यंत्रणा (फायर एक्स्टिंग्विशर) व आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग (इमर्जन्सी एक्झिट) यांची पाहणी करण्यात आली.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ‘दोन चालक’ नियमाचे पालन करणे बंधनकारक असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक व मालकांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला. ई-चलन प्रणालीद्वारे तपासणी करताना नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांकडून घटनास्थळीच थकीत दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button