
मेहरूण : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शालेय व्यवस्थापन समितीची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीदरम्यान शाळेचा आगामी शैक्षणिक वर्षासाठीचा शालेय विकास आराखडा (SDP) समितीसमोर सादर करण्यात आला.
या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रम, डिजिटल शिक्षणाचा विस्तार, पर्यावरण संवर्धन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
बैठकीत समिती सदस्यांनी आराखड्याविषयी सकारात्मक चर्चा करून विविध सूचना मांडल्या. शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शालेय विकास आराखड्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक प्रतिनिधी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.






