जळगावप्रशासकीय

जळगावात महिला दक्षता समिती गठीत; महिला व बाल सुरक्षेसाठी विविध उपक्रमांचा निर्णय

जळगाव : शासनाच्या सन २०२२ च्या जीआरनुसार पोलीस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून समितीची पहिली बैठक आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली.

समितीच्या अध्यक्ष पदी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,  सचिव पदी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) प्रदीप ठाकूर व पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्यासह समितीत सदस्य म्हणून डॉ रेणुका चव्हाण, ॲड. अनुराधा वाणी, ॲड .भारती कुमावत, गुळवे शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन नारखेडे, मानव सेवा माध्यमिक विद्यालयच्या प्रतिभा सूर्यवंशी, शकुंतला शाळेच्या राजश्री महाजन, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या विद्या सोनार व भाग्यश्री सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा रीतीने या समितीत विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर, वकील, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बैठकीत महिला व बालकांवरील गुन्हे प्रतिबंध, जनजागृती आणि शालेय स्तरावरील सुरक्षा उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीतील प्रमुख निर्णय :

जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये लहान मुलांवरील गुन्हे प्रतिबंध, कायदेशीर बाबी आणि आवश्यक कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

जळगाव शहरातील सुमारे २५ ठिकाणी पॉक्सो व सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच प्रमाणित आणि परिपूर्ण पीपीटी तयार करून ती सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये सादर केली जाणार आहे.

नव्याने कार्यरत करण्यात येणारे दामिनी पथक शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष लक्ष ठेवून नियमित पेट्रोलिंग करणार आहे.

दिनांक १८ रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून समन्वयाने आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button