
जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दि. ८ व ९ जुलै २०२६ रोजी द्वितीय वर्ष बी.एड. विद्यार्थ्यांसाठी सरावपाठ मार्गदर्शन व उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रतिभा पाटील या होत्या. सकाळी ११ वाजता सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी अध्यापन कौशल्ये विकसित व्हावीत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
प्रा. सुवर्णा अहिरे यांनी सरावपाठाची उद्दिष्टे, ज्ञान, आकलन, उपयोजन कौशल्ये, त्यांचे महत्त्व तसेच अध्यापन प्रक्रियेत त्यांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विविध उद्दिष्टे व घटकांनुसार सरावपाठाचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
त्यानंतर प्रा. जयश्री पाटील यांनी हर्बर्टच्या पंचपदीनुसार पाठाच्या पाच टप्प्यांचे सविस्तर विवेचन केले. प्रस्तावना, हेतूकथन, विषय विवेचन, संकलन, उपयोजन, गृहपाठ तसेच तुलना व संबंध, सामान्यीकरण आणि उपयोजन या प्रत्येक टप्प्याचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केले. यावेळी त्यांनी इंग्रजी विषयाचा आदर्श पाठ सादर करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
यानंतर प्रा. निधी शर्मा यांनी दिग्दर्शन पद्धतीचा वापर करून विज्ञान विषयाचा आदर्श पाठ सादर केला. डॉ. अनिता वानखेडे यांनी सामाजिक शास्त्र, भूगोल व इतिहास विषयांच्या अध्यापन पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करत अध्यापनातील विविध कौशल्ये, शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर, विद्यार्थी सहभाग आणि प्रश्नोत्तर तंत्र याविषयी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन सत्राच्या शेवटी डॉ. प्रतिभा पाटील यांनी मराठी व हिंदी विषयांच्या अध्यापन पद्धतीचा आदर्श पाठ सादर करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.
या उद्बोधन वर्गामुळे विद्यार्थ्यांना सरावपाठाचे नियोजन, प्रभावी सादरीकरण आणि अध्यापन कौशल्ये विकसित करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. डॉ. नारायण खडके यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. अनिता जावे, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






