
इंदापूर : प्रतिष्ठित नागरिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बनावट पुरावे तयार करून कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपप्रकरणी इंदापूर येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) महेंद्र निबाळकर यांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. चं. बारटक्के यांनी इंदापूर पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
फिर्यादी गोरख भोसले यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार, इंदापूर शहरातील एका किडनी केअर हॉस्पिटलचे संचालक असलेल्या भोसले यांच्याविरोधात फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन एपीआय महेंद्र निबाळकर यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून तक्रारीचा नमुना तयार करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्या गुन्ह्यात कारवाई करण्यात आली व अटकही करण्यात आल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे. या कारवाईनंतर संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबनही झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, जामिनावर सुटल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती गोरख भोसले यांना दिली. त्यानंतर तक्रारीचा नमुना, व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्डिंग तसेच मोबाईलमधील स्क्रीनशॉट यांसारखे पुरावे समोर आले असल्याचे अर्जात म्हटले आहे.
या पुराव्यांच्या आधारे २०१८ मध्ये महेंद्र निबाळकर व अन्य व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर डिजिटल पुराव्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे नमूद करत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.
या प्रकरणात फिर्यादी पक्षाचे वकील अॅड. राहुल मखरे यांनी, “निरपराध व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने दिलेली ही मोठी चपराक आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.





