
जळगाव : वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून समाजाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने राज्याचे मृदा व जलसंधारण तसेच भटक्या विमुक्त जमाती विभागाचे मंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात समाजातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा आणि मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची बाब मांडण्यात आली. तसेच जातीचे दाखले व इतर आवश्यक शासकीय कागदपत्रे मिळविताना येणाऱ्या अडचणींमुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले.
समाजातील बेघर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शासनामार्फत जमीन उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी निवारा मिळून भटकंती थांबण्यास मदत होईल, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
याशिवाय पात्र लाभार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा, जातीचे दाखले व आवश्यक कागदपत्रे सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्यावीत, बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, समाजाच्या वस्त्यांमध्ये आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत सध्या वास्तव्यास असलेल्या घरांच्या जागा संबंधित नागरिकांच्या नावे करून द्याव्यात, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
समाजाच्या या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी व वासुदेव जोशी गोंधळी समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी, सचिव रवींद्र जोशी, सदस्य सागर जोशी, हरीश जोशी, विनोद भोपे, संतोष जोशी, स्वप्नील जोशी, अनिल पवार आदी उपस्थित होते.






