जळगावप्रशासकीय

आशा सेविकांच्या प्रश्नांवर नगरसेविका अर्चना पाटील यांचा पाठपुरावा; प्रशासनाकडून प्रशिक्षणास सुरुवात

जळगाव, दि. ५ जून २०२६ : जळगाव महानगरपालिकेच्या मागील महासभेत नगरसेविका अर्चना पाटील यांनी आशा सेविकांना आवश्यक प्रशिक्षण (ट्रेनिंग) मिळत नसल्यामुळे त्यांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींचा मुद्दा ठामपणे उपस्थित केला होता. प्रशिक्षणाअभावी अनेक आशा सेविकांना विविध शासकीय कामे करताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच आवश्यक प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने काही आशा सेविकांचे मानधन व वेतन प्रलंबित राहिल्याची बाबही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

महासभेत या विषयावर प्रशासनाला जाब विचारत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर प्रशासनाने लवकरात लवकर प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने तातडीने दखल घेत दिनांक १ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीत आशा सेविकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.

आज प्रशिक्षणस्थळी भेट देऊन नगरसेविका अर्चना पाटील यांनी उपस्थित आशा सेविकांशी संवाद साधला. प्रशिक्षणादरम्यान येणाऱ्या अडचणी, कामकाजातील समस्या तसेच त्यांच्या विविध मागण्यांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. आशा सेविकांनी आपल्या समस्या मांडत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी अनेक आशा सेविकांनी नगरसेविका अर्चना पाटील यांचे आभार मानले. त्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय करून घेतल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यातही आमच्या विविध समस्या आणि हक्कांच्या प्रश्नांवर आपण असेच खंबीरपणे पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षाही आशा सेविकांनी व्यक्त केली.

आशा सेविकांच्या प्रश्नांबाबत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे त्यांच्या कामकाजाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच प्रलंबित मानधन व वेतनाशी संबंधित अडचणी दूर होऊन आशा सेविकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button