जळगावसामाजिक

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पंकज पाटील यांनी संपादन केली विधी पदवी

निकाल जाहीर होताच पाचोरा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव

पाचोरा – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे पदाधिकारी तथा सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सातत्याने सक्रिय असलेले पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील युवक सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांनी विधी (Law) पदवी परीक्षेत यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न मांडणे, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे तसेच तारखेडा गावातील विविध स्थानिक समस्यांबाबत आवाज उठविणे यासाठी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना पंकज पाटील म्हणाले की, “शिक्षण आणि पदवी सर्वच जण घेतात, मी देखील त्याला अपवाद नाही. व्यावसायिक कौशल्यासाठी मी बीबीए (BBA) पदवी प्राप्त केली होती. मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना अन्याय, शोषण आणि प्रस्थापित वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी जाणीवपूर्वक विधी शाखेची निवड केली. कायद्याचे ज्ञान हे समाजपरिवर्तनासाठी प्रभावी साधन असून सर्वसामान्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी त्याचा उपयोग व्हावा, हीच माझी भूमिका आहे.”

निकाल जाहीर झाल्याची माहिती मिळताच पाचोरा न्यायालय आवारात उपस्थित असलेले त्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एम. के. मोरे, पाचोरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील तसेच नामांकित नोटरी ॲड. नैनाव, माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे,  यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले. विधी क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी त्यांनी पंकज पाटील यांना शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.

सामाजिक आणि लोकहिताच्या विविध विषयांवर सक्रिय भूमिका घेत असल्याने विधी शिक्षणामुळे आपल्या जनहिताच्या कार्याला अधिक व्यापक दिशा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भविष्यात न्याय, समानता आणि सामाजिक जनजागृतीसाठी वकील म्हणून कार्य करण्याची त्यांची इच्छा असून वंचित, दुर्बल आणि सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे. कायद्याचे ज्ञान समाजहितासाठी वापरून नागरिकांमध्ये त्यांच्या अधिकारांविषयी जागृती निर्माण करण्यासाठीही ते प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतील मित्रपरिवार, ‘जगदंबा ग्रुप’, ‘आम्हणं तारखेडा ग्रुप’ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष आणि सामाजिक माध्यमांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंकज पाटील यांनी आपल्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे जाहीर आभार मानले.

पंकज पाटील यांचे हे यश परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक बांधिलकी, जनहिताची भूमिका आणि न्यायासाठी कार्य करण्याच्या त्यांच्या ध्येयामुळे त्यांच्या भावी वाटचालीबद्दल आशावाद व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button