जळगावसामाजिक

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

मेहरूण – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण संवर्धन अभियानाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नमस्वी आयुर्वेदचे डॉ. उमेश पाटील व डॉ. कोमल पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी ३० पर्यावरण संदेश देणारे टी-शर्ट भेट देत या अभियानाला मोलाचा हातभार लावला.

विद्यालयात वृक्षारोपण, वृक्ष संगोपन, प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण जनजागृती, ग्रीन बॅग गॅलरी, वृक्ष बँक यांसारखे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने डॉक्टर दांपत्याने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ. उमेश पाटील व डॉ. कोमल पाटील यांचे आभार मानत, समाजातील विविध संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे विद्यालयाचे पर्यावरण संवर्धन अभियान अधिक व्यापक होत असल्याचे सांगितले. अशा सामाजिक सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव, निसर्गप्रेम आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉक्टर दांपत्याच्या या सामाजिक योगदानाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला निश्चितच अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button