
मेहरूण : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकातील कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे “माझा पावसाळा – लाईव्ह न्यूज रिपोर्टर” हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला.
पावसाच्या रम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी टीव्ही वृत्तवाहिनीच्या धर्तीवर अँकर, फील्ड रिपोर्टर, कॅमेरामन आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या भूमिका साकारत थेट वार्तांकन केले. शाळेच्या परिसरातील पावसाचे वातावरण, हिरवाई, जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने बातम्या सादर केल्या.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य (Communication), चिकित्सक विचार (Critical Thinking), सर्जनशीलता (Creativity), सहकार्य (Collaboration), समस्या सोडविण्याची क्षमता, निरीक्षणशक्ती आणि आत्मविश्वास या २१ व्या शतकातील महत्त्वपूर्ण कौशल्यांना चालना मिळाली. प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी बातमी संकलन, माहितीची मांडणी, मुलाखत घेणे आणि प्रभावी सादरीकरण यांचा अनुभव घेतला.*
NEP-2020 मध्ये अनुभवाधारित, कौशल्याधारित आणि कृतीप्रधान शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये, नेतृत्वगुण, संघभावना आणि प्रसंगावधान विकसित होण्यास मदत झाली. वर्गातील शिक्षण प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
संस्थेचे अध्यक्ष मा. प्रशांत सुरेश नाईक यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्यात भविष्यकालीन कौशल्यांची जडणघडण होत असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षण आणि सादरीकरणाच्या माध्यमातून शिकविणे ही काळाची गरज आहे. शाळेत NEP-2020 च्या उद्दिष्टांनुसार अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांना प्रत्येक अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.






