
नशिराबाद : राज्य शासनाच्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत नशिराबाद येथे आयुष्मान आरोग्य मंदिराच्या वतीने विविध आरोग्य जनजागृती उपक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कीटकजन्य, जलजन्य व संसर्गजन्य आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमन पटेल व डॉ. स्नेहा कोलते यांच्या सूचनेनुसार आयुष्मान आरोग्य मंदिर, नशिराबाद येथे तसेच गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या डासांपासून होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय कुष्ठरोग व क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली. महिलांमध्ये एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच गरोदर मातांची रक्त तपासणीसह आरोग्य तपासणी करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहाय्यक लुकामान तडवी, आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, दीपक तायडे, वासुदेव पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय सपकाळे व नीलिमा येलगिरे, आरोग्य सेविका सुवार्ता ढालवाले, बफी साळुंके, हसरा तडवी तसेच आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेतले.






