जळगावसामाजिक

आडगावात अवैध दारू विक्रीवर कारवाईचा अभाव; ग्रामस्थांचा संताप, वरिष्ठांकडे धाव घेण्याचा इशारा

आडगाव ता. यावल – यावल तालुक्यातील आडगाव येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी स्थानिक पोलीस पाटील यांना निवेदन दिले होते. मात्र, निवेदनानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात अनेक ठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू असल्याने सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे. यामुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होत असून गावातील कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

पोलीस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावत असताना, निवेदनानंतरही अपेक्षित पावले उचलली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावातील महिला व पुरुष ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात येईल. गरज पडल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आडगावातील या प्रकरणी वरिष्ठ प्रशासन व पोलीस अधिकारी हस्तक्षेप करून अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक कारवाई करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button