जळगावसामाजिक

RTI हे सूड घेण्याचे नव्हे, तर सुशासनाचे लोकशाही साधन – भगवान चौधरी

पंचायत समिती जळगाव येथे ‘माहिती अधिकार दिन’ उत्साहात साजरा

जळगाव, दि. २८ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) :

“माहितीचा अधिकार (RTI) हा कोणाविरुद्ध सूड घेण्याचा कायदा नसून, शासनव्यवस्था अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख बनविणारे प्रभावी लोकशाही साधन आहे,” असे प्रतिपादन माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केले.

पंचायत समिती जळगाव येथे ‘माहिती अधिकार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भगवान चौधरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे होते. प्रमुख अतिथी म्हणून गणेश आमले तसेच सहायक गटविकास अधिकारी सुनील दांडगे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पंचायत समितीच्या वतीने भगवान चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रश्न विचारण्यापेक्षा दस्तऐवज मागा

मार्गदर्शन करताना भगवान चौधरी म्हणाले की, नागरिकांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज करताना प्रश्न विचारण्यापेक्षा प्रशासनाकडे उपलब्ध असलेली नोंदवही, कागदपत्रे, आदेश, अहवाल, मंजुरी, खर्चाचे तपशील, पत्रव्यवहार व इतर अभिलेख मागावेत. त्यामुळे माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट व प्रभावी होते.

“माहितीचा अधिकार हा नागरिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचे साधन नसून, प्रशासनामध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणारे माध्यम आहे. जागरूक नागरिक हाच लोकशाहीचा खरा आधार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

पारदर्शक प्रशासनासाठी सामूहिक संकल्प

यावेळी गटविकास अधिकारी मा.चंद्रकांत बोंडरे साहेब, सहायक गटविकास अधिकारी मा.सुनील दांडगे, गणेश आमले यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “माहिती मागू, माहिती समजून घेऊ, कायद्याचा योग्य वापर करू आणि पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनासाठी लोकशाही मार्गाने योगदान देऊ,” असा सामूहिक संकल्प केला.

“माहिती ही नागरिकांची ताकद असून पारदर्शकता ही सुशासनाची पहिली पायरी आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराचा वापर लोकहितासाठी आणि जबाबदारीने व्हावा,” असे आवाहन भगवान चौधरी यांनी केले.

कार्यक्रमास पंचायत समिती जळगावमधील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button