
मेहरूण : ज्येष्ठ अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या सामाजिक बांधिलकी, जलसंवर्धन व पर्यावरणप्रेमाच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. पारंपरिक पद्धतीने पुष्पहार अर्पण करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी शाळेत पिण्यासाठी आणलेल्या बाटल्यांमध्ये उरलेले पाणी फेकून न देता परिसरातील झाडांना देत ‘कृतीतून श्रद्धांजली’ वाहिली.
उन्हाळ्याच्या दिवसांत झाडांना पाण्याची मोठी आवश्यकता असते. अनेकदा पिण्याचे पाणी बाटलीत उरते आणि ते अनावश्यकपणे फेकून दिले जाते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ‘उरलेला प्रत्येक घोट झाडांसाठी’ ही संकल्पना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या बाटलीतील शिल्लक पाणी परिसरातील झाडांच्या मुळाशी टाकत पाणी बचतीचा आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकरी आणि ग्रामीण भागातील समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी ‘शब्दांजलीपेक्षा कृती श्रेष्ठ’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणला.
यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “आपण शाळेत पिण्यासाठी आणलेले पाणी शक्यतो पूर्ण वापरावे. मात्र काही पाणी उरलेच तर ते फेकून न देता झाडांना द्यावे. आपल्या बाटलीतील एक छोटासा उरलेला घोट एखाद्या झाडासाठी जीवनदायी ठरू शकतो. नाना पाटेकरांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाया घालवणार नाही’, ‘उरलेले पाणी झाडांना देऊ’, ‘झाडांचे संगोपन करू’ असा संकल्प केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचत, पर्यावरण संवर्धन, सामाजिक संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘फुलांचा हार नाही, झाडांच्या मुळांना पाण्याचा घोट; शब्दांजली नाही, कृतीतून श्रद्धांजली!’ या संदेशातून संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाना पाटेकर यांच्या कार्याला आगळीवेगळी मानवंदना दिली.






