जळगावक्राईम

जळगाव शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; अवघ्या ५ तासांत घरफोडीचा छडा, दोन सराईत चोर जेरबंद

जळगाव, दि. २७ जून : जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या पाच तासांत छडा लावत दोन सराईत चोरांना अटक करून चोरीतील बहुतेक मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्ह्यातील घरफोडी चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची बैठक घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.

दरम्यान, २५ जून २०२६ रोजी रात्री १०.०० ते २६ जून रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या दरम्यान शिवाजीनगर, भगतसिंग चौक परिसरातील घर क्रमांक १९६ येथे राहणारे सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी ४२ हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, १ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, १५ हजार रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, २ हजार रुपये किमतीची दोन किलो वजनाची पितळी कळशी तसेच ३ हजार रुपये रोख, ज्यामध्ये ५०० रुपयांच्या सहा नोटांचा समावेश होता, असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) व शेख शरीम शेख मुसेफ उर्फ मुसाब (वय २०, रा. सिंहगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली.

आरोपींकडून चोरीतील ४२ हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, १ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, १५ हजार रुपये किमतीचा नोकिया अँड्रॉइड मोबाईल, २ हजार रुपये किमतीची पितळी कळशी आणि ३ हजार रुपये रोख रक्कम असा बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी हा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, दीपक शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार व भगवान मोरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button