
जळगाव: धनत्रयोदशी अर्थात धनतेरसच्या निमित्ताने सोने-चांदी आणि ऐश्वर्याच्या पूजेऐवजी निसर्गाचे अनमोल धन असलेल्या वृक्षांचे पूजन करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आला. यावेळी वरणगावचे नगराध्यक्ष सुनीलजी काळे यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत धनतेरसला संपत्ती आणि समृद्धीचे विशेष महत्त्व आहे. मात्र, मानवी जीवनाला प्राणवायू, सावली, फळे आणि औषधी देणारी झाडे हीच खरी नैसर्गिक संपत्ती असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वृक्षांचे संवर्धन हीच खरी समृद्धी असून भावी पिढ्यांसाठी हरित पर्यावरण जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा विचार यावेळी मांडण्यात आला.मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वरणगावचे नगरसेवक नानाभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भेसे, आकाश निमकर, उपशिक्षिका रूपाली आव्हाड व भाग्यश्री सुर्वे उपस्थित होते.
पारंपरिक सणांना पर्यावरण संवर्धनाची जोड देत वृक्षांना धनाचे प्रतीक मानून त्यांचे पूजन करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसह समाजालाही निसर्गसंवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. ‘वृक्ष हेच खरे धन आणि त्यांचे संवर्धन हीच खरी समृद्धी’ हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला.






