
रावेर, दि. २० : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी रावेर तालुक्यातील पेसा क्षेत्रातील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी रात्री उशिरापर्यंत दुर्गम भागात भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
शुक्रवारी (दि. १९) झालेल्या या दौऱ्यात नायर यांनी रावेर पंचायत समिती आवारातील मेस, महिला व पुरुष स्वच्छतागृहे, सुरू असलेले सभागृह तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या बांधकामांची पाहणी केली. यावेळी स्वच्छता, दुरुस्ती व बांधकामांच्या दर्जाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर त्यांनी कुसुंबे खुर्द, पाल, सहस्त्रलिंग व खिरोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयांना भेट देऊन व्ही.बी. रामजी-६ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आवश्यक नोंदी व कागदपत्रे अद्ययावत ठेवून कामकाज अधिक प्रभावी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेत अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित यंत्रणांनी लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या शाळा खोल्यांचे बांधकाम तसेच भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्राच्या कामांची पाहणी करून कामांचा दर्जा, प्रगती व नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दौऱ्यादरम्यान नायर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संवाद साधत विविध प्रशासकीय अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
रात्र झाल्यानंतरही त्यांनी खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील आरोग्य सुविधांचा आढावा घेत नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे निर्देश दिले.
दुर्गम आदिवासी भागात रात्रीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रथमच प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या दौऱ्यात रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद मेढे, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता योगेश इंगळे, सहाय्यक अभियंता कोमल सिंग राजपूत, तालुका पेसा व्यवस्थापक युनुस तडवी, घरकुल विभागाचे आरएचई धीरज धनगर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






