जळगावसामाजिक

मेहरूण साई बाबा मंदिराच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त साई कथा संपन्न

जळगाव : मेहरूण मधील साईबाबा मंदिर समिती द्वारा साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त दिनांक २३ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत, रात्री ०८ ते ११ वाजेपर्यंत साई कथेचे आयोजन करण्यात आलेले होते. सुमारे ३७०० साई कथा करणारे साई कथाकार साई गोपालजी देशमुख, बीड यांच्या ओजस्वी वाणीतून कथा ऐकून श्रोते साई भक्तीत तल्लीन झाले.

साई कथा सांगताना साई गोपालजींनी सांगितले की, ” यदा यदाही धर्मस्य या गीतेच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे साक्षात भगवान श्रीकृष्ण हे शिर्डीत साईंच्या रूपाने अवतरले आहेत. ५०० वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ यांनी महाबली हनुमंतांना भगवंताचे वचन पुर्ण करण्यासाठी साई हे नाव देऊन हनुमानजींना आदेश केला त्यानुसार देवाला साई हे नाव मिळाले. साई म्हणजे साक्षात ईश्वर होय. शिर्डी मध्ये प्रकट होऊन साईंनी म्हाळसापती या भक्तासोबत एका पडक्या मशिदीत निवास सुरु केला. या मशिदीला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले. साईबाबांनी मशिदीत घंटा, तुळशी वृंदावन तयार करून अखंड धुनी पेटवली. साईनाथांनी शिर्डीत राहुन अनेक भक्तांना आपल्या लीला दाखवल्या व त्यांना चांगल्या मार्गाला लावले. बाबांच्या समवेत सर्व सामान्य लोकांपासून कलेक्टर, न्यायाधीश, राजकीय मंडळी असे अनेक भक्त मंडळी जमले.

जळगाव नगरीचा उल्लेख साई चरित्राच्या अध्याय : क्र.३२, ३३ मध्ये येतो; यामध्ये डेप्युटी कलेक्टरांच्या मुलीचे प्राण वाचवण्याकरीता सध्या बळीराम पेठेत असलेल्या साईबाबा मंदिराच्या जागी साई बाबा स्वतः ३तास टांगे वाल्याच्या रुपात थांबले आणि भक्तांचे रक्षण केले असा उल्लेख आहे. पोलीस हवालदार गणेश दत्तात्रय उर्फ दासगणू यांच्या मनात साई हिंदू की मुसलमान हा संभ्रम होता, साई बाबांनी दासगणूंना विठ्ठल रुपात दर्शन देऊन संभ्रम हा मिटवला . पुढे दासगणूंनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन हातात टाळ चिपळ्या घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर ‌बाबांच्या लीला लोकांपर्यंत पोहोचविल्या. अहमदनगरचा एक भक्त मेघा हा गुजराथी ब्राह्मण शिव शंकराचा कट्टर भक्त होता. तो साई बाबांना मुसलमान फकीर समजून त्यांना मानत नव्हता, त्याला साईनाथांनी साक्षात शिवशंकराच्या रुपात दर्शन दिले. हाच मेधा पुढे बाबांचा निस्सिम भक्त झाला . तसेच नांदेड शहराचा व्यापारी रतन शेठ वाडीया यांचा अहंकार दूर करून त्याला साईंनी संतती प्राप्तीचे वरदान दिले.

‘जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेल भक्तांसाठी’ असे वचन साईनाथांनी समाधी घेतांना आपल्या भक्तांना दिलेले आहे. त्यामुळेच साईंवर श्रद्धा असलेल्या लाखो भक्तांची रीघ आजही शिर्डीत लागलेली असते. कृष्ण अवतार साई आजही भक्तांच्या मनोकामना भक्तांच्या भक्तीनुसार पूर्ण करीत आहेत.” अशाप्रकारे विविध घटनांचे दाखले देत व भजनांद्वारे साई गोपालजी महाराजांनी साई कथा सांगितली. त्यांच्या सुमधुर भजनांचा आस्वाद घेत उपस्थित भक्तांनी आनंदाने तालावर ठेका घेतला.

आमदार राजू मामा भोळे, ग्राहक मंचच्या न्यायाधीश सौ सपना सपके , एमआयडीसी पोलीस स्टेशन निरीक्षक संदीप पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यासह मान्यवरांनी साई कथेला भेट दिली. याप्रसंगी साई गोपालजी व मंदिर समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक व समितीचे विश्वस्त यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला. २५ जानेवारी रोजी दु.१२.०० ते ४.०० या वेळेत मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जळगाव शहरातील सर्व साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सालाबादप्रमाणे साईबाबा मंदिर समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साई कथा व वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न होत असतो. कथेसाठी आयोजक साई बाबा मंदिर समितीचे सदस्य राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे, खन्ना पाटील, संतोष चाटे, कृष्णा सानप, बापू पाटील, गोकुळ सोनार, राकेश लाड, राकेश वाघ, किशोर सोनवणे, बबलू वाणी, दामू अण्णा चौधरी, चंद्रकांत लाडवंजारी , भानुदास नाईक, राजेश जाधव सर, प्रशांत लष्करे, रवी हंसवाल, अर्जुन बडगुजर तसेच साई कथेचे शशिकांत सरोदे, सांगा भाऊ, शंभू सुतार, मयूर सोनार यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button