
जळगाव, दि. १ जुलै : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील द्वितीय वर्ष बी.एड. प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या डॉ. प्रतिभा पाटील होत्या. सकाळी ११ वाजता सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. निधी शर्मा यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना उद्बोधन वर्गाचा उद्देश स्पष्ट केला. वर्षभर राबविण्यात येणारे उपक्रम, अभ्यासक्रम, प्रात्यक्षिके, आयसीटीचा वापर करून घटक नियोजन, तसेच विविध अध्यापन पद्धतींची माहिती विद्यार्थ्यांना देणे हा या वर्गाचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्बोधन वर्गाच्या समन्वयिका डॉ. जयश्री पाटील यांनी मार्गदर्शन व समुपदेशन, सर्वसमावेशक शिक्षण, इंग्रजी अध्यापन पद्धती आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रा. सुवर्णा अहिरे यांनी शारीरिक शिक्षण, योग, तसेच इतिहास अध्यापन पद्धतीतील प्रात्यक्षिक कार्याविषयी मार्गदर्शन केले.
प्रभारी प्राचार्या डॉ. प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सहशालेय उपक्रमांची माहिती देत सक्रिय सहभागाचे आवाहन केले. प्रा. निधी शर्मा यांनी आयसीटी, नाट्य व कला, विज्ञान अध्यापन पद्धती, तसेच पाठनियोजन तयार करून त्याची डिजिटल सीडी तयार करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
कार्यक्रमाच्या शेवटी साक्षी पाटील हिने आभार मानले. अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रा. डॉ. नारायण खडके यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, डॉ. अनिता जावे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.






