
मेहरूण : वटपौर्णिमेच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील वडाच्या झाडाला QR कोड लावून त्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली.
या QR कोडमध्ये वडाचे शास्त्रीय नाव, पर्यावरणीय महत्त्व, औषधी उपयोग, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेश समाविष्ट करण्यात आला. मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करताच वडाच्या झाडाची संपूर्ण माहिती उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी, महिला व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
वटपौर्णिमे निमित्त विद्यार्थिनींनी उपस्थित महिला व बालकांना वडाच्या झाडाचे महत्त्व समजावून सांगितले. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष असून पर्यावरण संतुलित ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती देण्यात आली. तसेच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
पर्यावरण समितीच्या अध्यक्षा रुपाली आव्हाड यांनी पर्यावरण रक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज व्यक्त केली. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. पर्यवेक्षिका शितल कोळी व पर्यवेक्षक निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व समजावून सांगत वृक्षसंवर्धनाची शपथ दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षणाची आवड निर्माण झाली असून वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.






