
जळगाव – पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन हद्दींमध्ये हिस्ट्रीशीटर्स, हॅबिच्युअल ऑफेंडर्स, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे आरोपी, टवाळखोर, प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपी तसेच इतर संशयित गुन्हेगारांची सविस्तर माहिती संकलित करून पोलिस स्टेशननिहाय ‘क्रिमिनल डोजियर M.O.B डेटा बेस’ तयार करण्यास शुक्रवार दिनांक २३ मे रोजी सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत संबंधित गुन्हेगारांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचे MOB (Modus Operandi Bureau) तसेच इंटरोगेशन फॉर्म भरून घेतले जात आहेत. यासाठी अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्वक बहुपानांचा विशेष फॉर्म तयार करण्यात आला असून त्यामध्ये संबंधित व्यक्तीची संपूर्ण पार्श्वभूमी नोंदवली जात आहे.

या फॉर्ममध्ये आरोपींचे कुटुंबीयांची माहिती, आधार व पॅन कार्ड तपशील, मालमत्ता, वाहने व ती कोणाच्या नावावर आहेत याची माहिती, सोशल मीडिया अकाउंट्स, शारीरिक खुणा, टॅटू, मित्रपरिवार, पूर्वीचे गुन्हे व त्यांची सद्यस्थिती, गुन्हा करण्याची पद्धत, कार्यक्षेत्र, व्यसनाधीनता, कर्ज आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाच्या मते, या मोहिमेमुळे प्रत्येक पोलिस स्टेशनकडे स्थानिक गुन्हेगारांचा अद्ययावत आणि सविस्तर डेटाबेस उपलब्ध होणार आहे. विविध पोलिस स्टेशनमध्ये माहितीची जलद देवाण-घेवाण होऊन गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. तसेच फरार आरोपींच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची माहिती उपलब्ध झाल्याने जप्ती आणि कठोर कारवाई करणे सुलभ होणार आहे.
याशिवाय पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर नवीन अधिकारी व अमलदारांना स्थानिक गुन्हेगारांची माहिती आणि प्रत्यक्ष ओळख सहज उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, ही प्रक्रिया अनेक ठिकाणी पोलिस स्टेशनच्या आवारात सार्वजनिकरित्या राबवली जात असून यामागे गुन्हेगारांचे सामाजिक खच्चीकरण करणे, त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण करणे आणि समाजात पोलिसांबद्दल विश्वास वाढवणे हा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.





