
जळगाव : आज सकाळी जळगाव जिल्हा पोलीस दलातील दंगा नियंत्रण पथक (RCP) आणि जलद प्रतिसाद पथक (QRT) यांचा महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला. या बैठकीत पथकांच्या कार्यपद्धती, शिस्त (कंडक्ट), तसेच काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत RCP पथकांच्या जमाव नियंत्रण आणि दंगल नियंत्रणातील भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. राजकीय रॅली, निदर्शने, सार्वजनिक उत्सव किंवा अचानक उसळणाऱ्या जनक्षोभाच्या वेळी परिस्थिती हाताळताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच QRT पथकांच्या जलद प्रतिसाद क्षमतेचा आढावा घेत, आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी कारवाई करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा सुचवण्यात आल्या. दहशतवादविरोधी कारवाया, ओलीस सुटका आणि उच्च जोखमीच्या घटनांमध्ये या पथकांची भूमिका अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी पथकांकडून प्रत्यक्ष काम करताना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सध्या एकूण १५ RCP पथके आणि २ QRT हिट टीम्स कार्यरत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही पथके सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.






