
जळगाव : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, परिसरातील शाळाबाह्य व गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या निर्णयामागील उद्देश म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. यासाठी विद्यालयातर्फे १ मे ते १ जून या कालावधीत विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार असून, शिक्षक व स्वयंसेवक घरोघरी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणार आहेत.
तसेच पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना नियमित शाळेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याचे विद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी सांगितले की, “एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवावे.”
या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, पालक व स्थानिक नागरिक यांचे सहकार्य लाभत असून, या मोहिमेमुळे अधिकाधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






