
जळगाव : जागतिक क्षयरोग दिन निमित्त श्री चामुंडा माता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल येथे जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजचे अध्यक्ष श्री. पी. ई. तात्या पाटील सर, सचिव श्री. राहुल पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. सुधांशू शेखर सिंग तसेच रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दरवर्षी २४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या या दिनाचा उद्देश क्षयरोगाबाबत जनजागृती करणे व त्यापासून बचावासाठी लोकांना शिक्षित करणे हा असल्याचे सांगण्यात आले.
डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी सांगितले की, क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयाच्या औषध विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजार गंभीर होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षीची संकल्पना “होय, आपण टीबी संपवू शकतो” अशी असून २०३० पर्यंत टीबी निर्मूलनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारताने यामध्ये लक्षणीय प्रगती केली असून २०१५ मध्ये प्रति लाख २३७ रुग्णांवरून २०२४ मध्ये हा आकडा १८७ पर्यंत कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना क्षयरोगाची सुरुवातीची लक्षणेही समजावून सांगण्यात आली. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, छातीत दुखणे, कफ किंवा रक्त येणे, वजन घटणे, सौम्य ताप व रात्री घाम येणे ही लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले. काही प्रकरणांमध्ये ‘सुप्त क्षयरोग’ (latent TB) आढळतो, ज्यामध्ये रुग्णाला लक्षणे नसतानाही संसर्ग पसरू शकतो, असेही सांगण्यात आले.
यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी क्षयरोगमुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेतली. तसेच ओपीडीमध्ये मास्क वापर, संशयित रुग्णांची तपासणी व त्यांना पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने इंटर्नशिपच्या विद्यार्थ्यांनी धनवड गावात घरभेटी देऊन सर्वेक्षण केले. दीर्घकाळ खोकला, सर्दी व ताप असलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जागरूकता निर्माण झाली असून क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.






