क्राईमजळगाव

सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाविरोधात स्वतः एस.पी. श्रीकांत धीवरे मैदानात

जळगाव – शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मद्यपान करणाऱ्यांविरोधात आता पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे.

सर्वसामान्य नागरिक, महिला आणि कुटुंबांना सार्वजनिक ठिकाणी ग्रुपने बसून दारू पिणाऱ्या व्यक्तींमुळे त्रास व उद्विग्नता निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज सायंकाळपासून शहरातील ओपन स्पेस, वाइन शॉप परिसर, रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमध्ये तसेच छोट्या हॉटेल्समध्ये उघडपणे मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत, कारवाई ही केवळ कागदोपत्री न राहता ती समाजाला प्रत्यक्ष दिसली आणि जाणवली पाहिजे, असे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे वाइन शॉपच्या बाहेर आडोशाला अथवा कारमध्ये बसून मद्यपान करणाऱ्यांनाही आता पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

तसेच काही छोट्या हॉटेल्समध्येही उघडपणे मद्यपान होत असल्याच्या तक्रारींनंतर अशा ठिकाणांवरही पोलीसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरल्याने या मोहिमेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून, संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही अधिक सक्रियपणे कामाला लागावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

या मोहिमेमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून, नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button