
जळगाव, दि. २ जून – जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी जळगाव पोलीस दलाच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाची बैठक आयोजित करण्यात आल्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
बैठकीत पोलीस अधीक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, मालमत्तेसंबंधी वाद, कौटुंबिक प्रश्न, आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती, फसवणुकीचे प्रकार तसेच सार्वजनिक सेवांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बँक अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, केवायसी अपडेटच्या नावाखाली होणारे प्रकार, ओटीपी व यूपीआयद्वारे होणारी आर्थिक फसवणूक, बनावट गुंतवणूक योजना, डिजिटल अरेस्ट, सोशल मीडियावरील फसवे संदेश आणि ऑनलाइन खरेदीतील धोके याबाबत माहिती देण्यात आली.
तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीस बँक खाते, एटीएम, ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद कॉल व संदेशांपासून सावध राहावे आणि फसवणुकीची घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
घरफोडी, चोरी, मालमत्तेची फसवणूक, बनावट ओळख सांगून होणारे गुन्हे तसेच घरगुती मदतनीस व केअरटेकर यांची पडताळणी करण्याचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांची सुरक्षा, सन्मान व कल्याण ही जळगाव पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बैठकीनंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत जळगाव पोलिसांच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले. पोलिसांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने अनेक प्रश्न व समस्या मांडता आल्या, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलता, लोकाभिमुख दृष्टीकोन आणि समुदायाभिमुख पोलिसिंगची बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम असून भविष्यातही अशा बैठकींचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.






