

जळगाव (२८ सप्टेंबर) : पिंप्राळा येथील पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालयात श्री. जगदीश रवींद्र बियाणी फाउंडेशन, जळगाव तर्फे महान क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. जगदीश रवींद्र बियाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पिंप्राळा वार्डातील माजी नगरसेवक सुरेश भाऊ सोनवणे, अतुल भाऊ बारी यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते.
शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या जीवनावर आधारित नाटकाचा सराव सादर करण्यात आला. कलाकारांनी दिलेल्या उत्स्फूर्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्यांनी आपापल्या मनोगतात शहीद भगतसिंग यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचे आणि युवकांनी त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौरभ खैरनार यांनी केले.




