जळगावशैक्षणिकसामाजिक

जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांच्या एन.पी.एस. कपातीच्या रकमा त्वरीत जमा करण्याची जुक्टो संघटनेची मागणी

जळगाव – जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मासिक वेतनातून कपात झालेल्या एन.पी.एस. (नवीन पेन्शन योजना) वर्गणीच्या रकमा तब्बल एक वर्ष उलटूनही अद्याप खात्यात जमा झालेल्या नाहीत. या गंभीर समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही केवळ थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याने जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे.

आज कार्यसम्राट पदवीधर आमदार सत्यजितदादा तांबे जळगाव महानगरात कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले असता, संघटनेच्या महानगर कार्यकारिणीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन प्रलंबित न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील माहे ऑगस्ट २०२४ तसेच जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यानच्या एन.पी.एस. कपातीच्या रकमा अजूनही संबंधितांच्या खात्यात न जमा झाल्याची वस्तुस्थिती सांगण्यात आली. पुढील महिन्यात अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत असून या थकबाकीमुळे त्यांचे पेन्शन प्रस्ताव तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वित्त विभागाने १० जुलै २०२५ रोजी मिसिंग/क्रेडिट रकमेबाबत शासन निर्णय जारी करूनही प्रत्यक्षात रकमा जमा न झाल्याने शिक्षकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली.

तसेच २०१८-१९ पासून प्रलंबित असलेले घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन तातडीने देणे, उपसंचालक कार्यालयाद्वारे टप्पा वाढीची पत्रके निर्गमित करणे, तसेच पेन्शन विकल्पाबाबत वित्त विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून ती शिक्षकांना कळविण्याची मागणीही करण्यात आली.

ही मागणी प्रा.अनिता ओहळ, प्रा.छाया चौधरी, प्रा.महेंद्र राठोड, प्रा.योगेश धनगर, प्रा.सुनील गरुड व डॉ.अतुल इंगळे यांनी आमदारांना निवेदन देऊन मांडली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.नंदन वळिंकार यांनीही फोनद्वारे आमदारांशी चर्चा करून समस्या तातडीने निकाली काढण्याचे साकडे घातले.

याची गंभीर दखल घेत आमदार सत्यजित तांबे यांनी त्वरित वेतन पथक अधीक्षक रियाज तडवी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून एन.पी.एस. कपातीच्या रकमा शिक्षकांच्या खात्यात त्वरीत जमा करण्याचे आदेश दिले. श्री.तडवी यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत सदर रकमा जमा करण्याची हमी आमदारांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button