
चाळीसगाव, प्रतिनिधी : येथील उद्दाम स्वयंदीप अपंग विकास बहुद्देशीय संस्थेला रविवारी श्री व श्रीमती धिवरे यांनी सदिच्छा भेट देत संस्थेतील दिव्यांग मुलींच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संस्थापक अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी निकम यांच्याशी संवाद साधून संस्थेच्या उपक्रमांबाबत जाणून घेतले.

संस्थेतील मुलींशी मनमोकळा संवाद साधताना त्यांच्या दैनंदिन जीवनातील आव्हाने, संघर्ष, शिक्षण, रोजगार व स्वावलंबनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. मुलींनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी करून त्यापैकी काही वस्तू खरेदी केल्या. तसेच संस्थेने तयार केलेल्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळावी, मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स प्राप्त व्हाव्यात आणि संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

अशा प्रकारच्या भेटींमुळे संस्थेतील मुलींना समाजाकडून मिळणारा आधार आणि प्रोत्साहन वाढते. त्यांच्या आत्मविश्वासात भर पडून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. याशिवाय स्थानिक पोलीस यंत्रणेमध्येही दिव्यांग व वंचित घटकांविषयी अधिक संवेदनशीलता निर्माण होण्यास मदत होते. संस्थेतील मुलींच्या सुरक्षितता आणि संरक्षणासंबंधी बाबींना अधिक प्राधान्य देण्याची जाणीव अशा उपक्रमांमुळे दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत श्री धिवरे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला असून त्यांच्या या भेटीचे संस्थेकडून स्वागत करण्यात आले.






