
जळगाव – गुरवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी, सुप्रीम इंडस्ट्री व श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने, सुप्रीम इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक शिवरत्नजी तापडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रीम इंडस्ट्रीज गाडेगाव येथील सर्व अधिकारी – कर्मचारी तसेच सर्व मजूरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये दुर्धर आजार तज्ञ डॉ. सुधांशु सिंग, मधुमेह तज्ञ डॉ. नरेंद्र शर्मा, अस्थिरोग तज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, मेडिसिन विभागात होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, नेत्र विभागात नेत्र चिकित्सक डॉ.जयेश वाल्हे, नेफ्रोलोजी तज्ञ डॉ. प्रफुल्ल धांडे, त्वचारोग तज्ञ डॉ. जयश्री शेळके, अस्थमा तज्ञ डॉ. रेश्मा चव्हाण या सर्व डॉक्टरांनी सुप्रिम कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच सर्वाना होमिओपॅथी औषधी मोफत देण्यात आली. यासह एकूण 400 कर्मचारी व मजुरांना मोफत टी. टी.ची लस देण्यात आली. तसेच मोफत रक्तगट व मधुमेह चाचणी करण्यात आली.
श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री.पी. ई.तात्या पाटील यांच्या हस्ते सुप्रीम इंडस्ट्री येथे वृक्ष लागवड करण्यात आली. सुप्रीम इंडस्ट्री गाडेगाव येथील अधिकारी सुरेशजी मंत्री व श्री.चामुंडामाता मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून या महा-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यापुढे सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना कॉलेजमध्ये मोफत उपचार व औषधी देण्यात येतील व सुप्रीम इंडस्ट्रीज, जळगाव येथील प्लांटमध्ये सुद्धा महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.
श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य. डॉ. सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक डॉ.नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी नवल परदेशी यांच्यासह कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.






