नवापूर तालुक्यात वन जमिनींवर अतिक्रमणाचा प्रयत्न, आदिवासी शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप
लोकसंघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


नंदुरबार, दि. ०२ एप्रिल: नवापूर तालुक्यातील जंगल क्षेत्रांवर मोठ्या उद्योगपतींच्या घशात टाकण्यासाठी सरकार वन हक्क कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप होत आहे. नवापूर तालुक्यातील भांगडा गावात मेघा इंजिनियरिंग लिमिटेड ही कंपनी वन जमिनींवर बेकायदेशीर मोजमाप करत असून, येथील वन पट्टेधारक व अद्याप प्रलंबित दावेदार असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना धमकावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
स्थानिक ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता ही कंपनी गावच्या वन क्षेत्रात जमिनीचे मोजमाप करून खुंटे गाडत आहे. विशेष म्हणजे, या मोजमापात आदिवासी शेतकऱ्यांच्या वन जमिनीतही खुंटे ठोकले जात असून, स्थानिक लोकांनी याला विरोध केल्यावर “तुमचा सातबारा आणा, अन्यथा मिल्ट्री आणू” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाविरोधात भांगडा गावाच्या वन हक्क समितीचे अध्यक्ष व स्थानिक शेतकरी यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. जिल्हाधिकारी मिताली सेठी या दौऱ्यावर असल्याने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपवण्यात आले. कंपनीचा हा बेकायदेशीर हस्तक्षेप त्वरित थांबवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक आदिवासी समाजाने वन हक्क कायद्याच्या संरक्षणासाठी एकत्र येत हा अन्याय थांबवण्यासाठी तीव्र लढा उभारण्याची भूमिका घेतली आहे.




