जळगावप्रशासकीय

जळगाव जिल्हा पोलीस दलाची शांतता कमिटीची बैठक: समाजातील सौहार्द कायम ठेवण्याचा निर्धार

जळगाव, २५ मार्च २०२५ – श्रीराम नवमी, रमजान ईद, हनुमान जयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या आगामी महत्वपूर्ण सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी शांतता कमिटीची

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी समाजातील जबाबदार नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शांतता राखण्यास मदत करावी, असे आवाहन केले. तसेच, समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान राखावा आणि समाजात अज्ञान दूर करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सुचवले.

सोशल मीडियाचा गैरवापर आणि सुरक्षेच्या उपाययोजना

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक आक्षेपार्ह पोस्ट करत असल्याने समाजात तणाव निर्माण होतो. अशा प्रकारच्या घटनांबाबत नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. व नागरिकांनी सायबर गुन्ह्यांबाबतही जागरूक रहावे असे आवाहन त्यांनी केले.तसेच मिरवणुकांमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवून शांततेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असेहि त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांकडून महत्त्वपूर्ण सूचना

शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी शहरातील सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या –

आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट पोलिसांना तत्काळ कळवाव्यात.

शहरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.

११ एप्रिल रोजी महात्मा फुले मार्केट आणि १४ एप्रिलच्या आधी मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करावा.

शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप

बैठकीच्या शेवटी, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वितरित करण्यात आले. वाहतुकीचे नियम पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर गरजेचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले, तर आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button