
मेहरूण : गुढीपाडव्याच्या पावन पर्वानिमित्त मेहरून येथील छत्रपती शिवाजी चौक येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गुढी उभारण्याचा भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, संपूर्ण वातावरण उत्साह आणि भक्तिभावाने भरून गेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी नगरसेवक प्रशांत नाईक व सौ. अर्चना प्रशांत नाईक यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली असून, यावेळी उपस्थितांनी ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा’ देत एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी घनश्याम दहिवदकर यांनी सामूहिक गुढीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते तसेच आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यास चालना मिळते. सण-उत्सव हे केवळ आनंदासाठी नसून समाजाला एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी सणाचा उत्साह अधिकच वाढविला. गुढी उभारणीसोबतच उपस्थितांनी एकत्र येत सण साजरा करत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमात ओम शैलेश सूर्यवंशी, सनी किरण घुगे, गिरीश वाघ, प्रणव वंजारी, भूषण वाघ, आदित्य पाटील, देवेश सोनवणे, रोहित वंजारी, नीरज तायडे, अनिकेत वंजारी, प्रणव घुगे, करण वाघ ओम वंजारी दींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






