

जळगाव, दि. 25 मार्च – जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांच्या भावनिक विकासाला चालना देत सकारात्मक विचारसरणी रुजवण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. याच पार्श्वभूमीवर, सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने जळगाव जिल्हा कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’ या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंदीबांधवांचे समुपदेशन देशभक्तिपर गाण्यांच्या साहाय्याने करण्यात आले. संगीताच्या प्रभावी माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर राहण्याचा संदेश देत त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
समारंभाचा उत्साहपूर्ण शुभारंभ
जिल्हा कारागृहाच्या कला भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. जे. चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, श्री. खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या संगीतमय प्रबोधन उपक्रमाचे आयोजन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, मुख्यमंत्री यांच्या अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात हा उपक्रम राबवला जात आहे.
देशभक्तीच्या गीतांनी भारावले कारागृह
कार्यक्रमाची सुरुवात स्वर शुभम ग्रुपच्या प्रतीथयश कलाकार कपिल घुगे व सहकारी यांच्या सादरीकरणाने झाली. “इतनी शक्ति हमें देना दाता” या प्रार्थनेसह कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध देशभक्तिपर गीते सादर होताच संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. बंदीबंधूंनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली. “भारत मातेच्या जयघोषाने” संपूर्ण कारागृह दुमदुमून गेले. विशेष म्हणजे, काही बंदीबंधूंनी स्वतःही भक्तिगीत व देशभक्तिपर गीते सादर करून कार्यक्रमात योगदान दिले.
शाहीर विनोद ढगे यांच्या भारुडाने प्रभावी प्रबोधन
लोकशाहीर शाहीर विनोद ढगे आणि त्यांची ‘दिशा काला पथक’ या संस्थेतर्फे पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून प्रभावी भारुड सादर करण्यात आले. व्यसनमुक्ती आणि सकारात्मक जीवनदृष्टीवर भर देणाऱ्या या भारुडाने उपस्थितांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
कलाकारांचा प्रभावी सहभाग
या कार्यक्रमात स्वर शुभम ग्रुप व दिशा काला पथक या दोन संस्थांचे १५ हून अधिक कलाकार सहभागी झाले. कार्यक्रमाची सांगता स्वर शुभम ग्रुपच्या कलाकार वर्षा पाटील यांनी “है मालिक, तेरे बंदे हम” या गाण्याने केली.
कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, विनोद पाटील, आकाश भावसार, मनोज जैन यांनी विशेष मेहनत घेतली.




