
जळगाव : गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘एक पंगत, एक माणुसकी’ हा अभिनव भेदभावमुक्त लंगर भोजन उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. जात-पात, धर्म, श्रीमंती-गरिबी असे सर्व भेद विसरून विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकाच पंगतीत बसून भोजनाचा आनंद घेत सामाजिक समतेचा अनोखा संदेश दिला.
गुरुनानक देवजी यांनी संपूर्ण मानवजातीला समानता, बंधुभाव, मानवता आणि सेवाभावाची शिकवण दिली. त्यांच्या विचारांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने विद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शीख धर्मातील लंगर परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. लंगर म्हणजे केवळ सामूहिक भोजन नसून प्रत्येक माणूस समान आहे, कोणीही मोठा किंवा लहान नाही, हा मानवतेचा संदेश देणारी परंपरा असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे भोजन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः भोजन वाढण्याची सेवा केली. भोजनानंतर ताटे उचलणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी आनंदाने पार पाडली. यातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा, सहकार्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व अनुभवता आले.
यावेळी गुरुनानक देवजींच्या ‘नाम जपो, किरत करो, वंड छको’ या तीन मूलभूत शिकवणींचा परिचय करून देण्यात आला. ईश्वराचे स्मरण करा, प्रामाणिक कष्ट करा आणि मिळवलेले इतरांसोबत वाटून घ्या, या विचारांचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
केवळ पुस्तकातून संस्कार न शिकवता प्रत्यक्ष कृतीतून माणुसकी, समानता आणि सेवाभाव रुजविण्याचा विद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा अनुभव ठरला. ‘एक पंगत, एक माणुसकी’ या संकल्पनेतून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.






