
जळगाव : सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मंगळवारी (दि. ८) व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील होत्या. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सुवर्णा अहिरे यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे व जिल्हा समन्वयक डॉ. संजय काशिनाथ पाटील यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वेळेचे नियोजन, सकारात्मक विचार, स्वयंशिस्त, उत्तम श्रोता बनणे आणि आत्मविश्वास या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी उत्तम साहित्याचे नियमित वाचन करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील यांनी आत्मविश्वास वाढविण्यासोबतच दर्जेदार साहित्याचे वाचन करण्याचे आवाहन केले. आदर्श नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडावीत तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सरला सोनवणे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. नारायण खडके यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, ग्रंथपाल पंकज वाघ, अरविंद पवार, चंद्रकांत सपकाळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेस बी.एड. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.






